February 11, 2026 12:16 am

आई: काट्यांवर चाललेली फुलांची वाट

 

आई: काट्यांवर चाललेली फुलांची वाट

मातृदिन आला की सगळीकडे मातेसाठी गोड गोड शब्द, शुभेच्छा, हार-तुरे आणि आठवणींचे पूल उभे राहतात. पण माझ्यासाठी मातृदिन म्हणजे केवळ एक खास दिवस नाही – तो संपूर्ण आयुष्यभरासाठी तिच्या आठवणींचा उजेड आहे. ती आई – जिने माझं आयुष्य घडवलं, तिची कथा फक्त एक दिवसापुरती नसून प्रत्येक श्वासात, प्रत्येक यशात, प्रत्येक अश्रूमध्ये विखुरलेली आहे.

मी लहान होतो… आईच्या पदराला धरून चालायचो. घरात साजूक तूप नव्हतं, पण मायेचा ओलावा भरपूर होता. माझ्या दोन बहिणी आणि मी – आम्ही आईच्या मायेच्या सावलीत वाढत होतो. वडिलांनी सरकारी नोकरी सोडली होती – आयुष्याची गाडी थांबली होती. पण आईने ती दोन्ही हातांनी ओढायला सुरुवात केली.

आईला कधी शेतीचं काम माहीत नव्हतं. पण गरजेनं तिला राबायला लावलं. खुरपणी, निंदणी, शेतातली खडीवाट – सगळं आईनं स्वीकारलं. रोज पाच किलोमीटर चालत जाऊन खुरपायला जायची. संध्याकाळी हातात थोडीशी बाजरी घेऊन यायची – आणि मग घरात भाकरी होत्या.

त्या काळात घरात काहीच नसायचं. शेजारच्या लोकांनी दिलेल्या वाळलेल्या चपात्या आई जपून ठेवायची. ती चपात्यांचे तुकडे करून आम्हाला द्यायची. आम्ही खेळताना त्या तुकड्यांवर तहान-भूक विसरायचो. पण आईचं हृदय मात्र रोज एकदा तुटायचं – जेव्हा ती स्वतः उपाशी राहून आमच्या तोंडात घास द्यायची.

त्या काळात बाप घरात नसायचा. काही वेळा सहा, आठ महिने गायब व्हायचा. ज्या माणसाने घर चालवायचं, तो स्वतःच्या व्यसनात बुडालेला होता. पण आईने तेही सहन केलं. उपोषण केलं, त्याला पुन्हा नोकरीवर लावलं. पण पगार घरात यायच्या आधीच दारूत ओतला जायचा.

त्या काळात आई एकटी होती, पण ती कोसळली नाही. तिच्या पाठीला आधार नव्हता, पण तिचा कणा वाकला नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते कधी आम्हाला दिसू दिले नाहीत. ती पाठीमागे थांबली नाही, कारण ती आमच्या पुढच्या पिढीसाठी वाट तयार करत होती.

ती आम्हाला शिकवत राहिली – “कोणापुढे हात पसरणं नाही. शिळ्यावर दिवस काढा, पण आत्मसन्मान जपा.” आणि खरंच – त्या शिकवणीने आम्हाला मोठं केलं. आज आम्ही सगळे स्वतःच्या पायावर उभे आहोत, पण त्या पाया खालची माती आईच्या घामाची आहे, अश्रूंची आहे.

लग्न जमवताना आमचे तेव्हा वडील त्या वेळी सोबत नव्हते. पण आईनेच दोन्ही बहिणींचं, आणि शेवटी माझंही लग्न केलं. प्रत्येक सण, प्रत्येक समारंभ तिने एकटीने निभावला. तिने फक्त घर सांभाळलं नाही, तर आम्हाला घडवलं.

आज आम्ही कामानिमित्त बाहेर असतो. ती आई आता वयोवृद्ध झाली आहे. पण अजूनही तिचा फोन आला की पहिला प्रश्न – “जेवलास का रे?”
ती आता एकटी झोपते, पण स्वप्न मात्र आमच्याच येण्याची पाहते. आम्ही तिला पाहिजे, पण ती अजूनही म्हणते – “माझं काही नाही गं, तू बघ तुझं.”

मातृदिन आला की लोक गिफ्ट्स देतात, फोटो पोस्ट करतात. पण माझ्यासाठी मातृदिन म्हणजे ती पहिली भाकरी – जी आईनं पोट रिकामं ठेवून दिली होती. तो काटा – जो तिच्या पायात घुसला होता, पण तरीही ती आमच्यासाठी चालत राहिली होती.

आई म्हणजे फक्त जन्मदात्री नाही… ती जीवनदात्री आहे.
आई म्हणजे एक पुस्तक – ज्यात प्रत्येक पानावर त्याग, प्रेम आणि माया लिहिलेली आहे.
आई म्हणजे देव – जो दिसतो, आपल्यासोबत चालतो आणि कधी न थकता आपल्यासाठी उभा राहतो.

 

आई, तुझा हात धरून चालायला लागलो,
तरी चालायला शिकल्यावर तुझं महत्त्व अधिक कळलं.
आज कितीही मोठा झालो,
तरी तुझ्या पदराच्या सावलीत लपायचं स्वप्न अजूनही जपतो.
तू नसतीस, तर ‘मी’ असतोच कसा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें