पिस्तूल दाखवून व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल; शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना प्रमुखाचा सहभाग
जेजुरी, पुरंदर (पुणे): जेजुरी एमआयडीसी परिसरात एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) युवासेना प्रमुख ओंकार नारायण जाधव याच्यासह पाच जणांविरोधात खंडणी, अपहरण आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार बजरंग हनुमंत पवार (रा. जेजुरी) यांनी दिलेल्या माहितीवरून जेजुरी पोलिसांनी ओंकार जाधव, हर्षल गरुड (रा. बेलसर) आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
घटनाक्रम:
शनिवार, 3 मे रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता बजरंग पवार हे दुचाकीवरून घरी जात असताना हर्षल गरुडने त्यांना अडवले. त्यानंतर ओंकार जाधव व अन्य आरोपींनी त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले आणि मावडी पिंपरी गावाच्या हद्दीतील एका शेतात नेले. तेथे डोक्याला पिस्तूल लावून धमकावत 5 लाख रुपये आणि दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली.
“तुझा भंगार व्यवसाय आहे, माझ्याकडे गँग आहे, माझी पोरं कमरेला घोडे लावून फिरतात. तुला मारायला वेळ लागणार नाही,” अशा धमक्यांसह खंडणीसाठी दबाव टाकण्यात आला, असे तक्रारीत नमूद आहे. आठ दिवसांत पैसे देण्याची सक्ती करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी पवार यांना मोरगाव चौकात आणून सोडले.
पोलीस कारवाई:
या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 308(2), 137(2), 140(2), 352, 351, 189(2), 191(2) तसेच शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 3 (25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत.
या प्रकरणामुळे जेजुरी परिसरात खळबळ उडाली असून व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.