June 20, 2025 9:39 am

प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी कठोर धोरण तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनांना इंधन बंदीचा इशारा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

प्रदूषणावर लगाम घालण्यासाठी कठोर धोरण
तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनांना इंधन बंदीचा इशारा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना लवकरच इंधन मिळणे अशक्य होणार आहे. यासंदर्भात एक कठोर धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयात परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

सरनाईक यांनी सांगितले की, “राज्यात पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असून, त्याचा थेट परिणाम वायू प्रदूषणावर होत आहे. अनेक वाहनधारक बोगस किंवा चुकीच्या पद्धतीने प्रदूषण प्रमाणपत्र मिळवत असल्याने रस्त्यावर तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे आणि AQI (Air Quality Index) खालावत चालला आहे.”

या पार्श्वभूमीवर सरकारने QR कोड आधारित PUC प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यापूर्वी वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र स्कॅन करून तपासले जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रमाणपत्र नसेल, त्यांना इंधन नाकारले जाईल. “No PUC, No Fuel” हे धोरण राज्यभर लागू केले जाईल.

पर्यावरण रक्षणासाठी हे धोरण अत्यंत गरजेचे असल्याचे सांगताना सरनाईक म्हणाले, “प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भावी पिढ्यांना शुद्ध हवा मिळण्यासाठी आजच कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नियम अंमलात आणणे अपरिहार्य आहे.”

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल पंप चालक, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिक यांची जबाबदारी यामध्ये महत्त्वाची असणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें