भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी, दि. ४ मे, शिरूर
उन्हाळ्यातील भीषण तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भामा आसखेड धरणातून उन्हाळी आवर्तनाचे पाणी मांडवगण येथील सांडव्यातून भीमा नदीत सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाण्यामुळे शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, कानगाव, नानवीज, नांदखिले गार, सोनवडी आणि सांगवी या गावांमध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना चांगली पाण्याची आवक झाली आहे. विशेषतः सोनवडी येथील सोनवणे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी पोहोचल्याने परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा सुलभ होणार आहे.
शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, महाराष्ट्र भूमीच्या पाण्यासाठी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटत आहे. यामुळे भुईमूग व अन्य पिकांची पाणीटंचाई दूर होणार असून, जनावरांच्या चार्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.
हा निर्णय शासनाच्या आणि संबंधित विभागाच्या समन्वयातून लवकर घेतल्यामुळे उन्हाळ्यातही शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित करणारा हा निर्णय, ग्रामीण भागाच्या जलसिंचनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.