धर्माच्या नावाखाली दबाव, देवांचा अपमान… उचाळेवस्तीतील गायकवाड कुटुंबाच्या श्रद्धेवर घाला! आमदार लांडगेंच्या पुढाकाराने उघड झाला धर्मांतराचा कट
शिरूर, दि. ४ मे:
“तुमच्या देवांनी काय केलं?” असा सवाल करत काही लोकांनी थेट गायकवाड कुटुंबाच्या दारात जाऊन त्यांची श्रद्धा डागाळण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून अंगावर शहारे येतात. शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी (उचाळेवस्ती) येथे घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेवर झालेला आघात आहे.
गुरुवारी (१ मे) सायंकाळी, गायकवाड कुटुंब आपल्या घराबाहेर शांतपणे बसले असताना, सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी पोहचल्या. “तुम्ही कोणत्या धर्माचे?”, “चर्चमध्ये या, आर्थिक फायदा होईल”, “प्रभु येशूची कृपा होईल” असे आमिष दाखवण्यात आले. त्याहीपेक्षा अधिक धक्कादायक म्हणजे, “तुमच्या देवांनी काय केलं?” अशा अवमानकारक शब्दांत हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला.
या प्रकरणाने गायकवाड कुटुंब भयभीत झाले आणि त्यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेतली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अखेर ही माहिती भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस हलले आणि धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची नावे:
प्रशांत जालिंदर घोडे (उचाळेवस्ती), मोजस बार्बनबस डेव्हिड, अमोल गायकवाड, योगेश रक्षत, जेसी अँथोनी, कुणाल भावणे, सिध्दांत कांबळे — हे सर्व आरोपी आता शिरूर पोलिसांच्या रडारवर असून तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
धर्मपरिवर्तनाचा जाळं गावागावात!
बजरंग दल व अन्य संघटनांनी आरोप केला आहे की, अशा प्रकारचे धर्मांतराचे प्रयत्न शिरूर परिसरात सातत्याने सुरू आहेत. गावागावात फिरून नागरिकांवर आमिष आणि दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास अशा कटकारस्थानांना बळ मिळेल, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने घ्यावी ठोस भूमिका
या प्रकारावर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. हे केवळ धर्माचा प्रश्न नाही, तर लोकांच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक सलोख्याचा प्रश्न आहे. राज्य सरकारने याबाबत लक्ष घालून अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हीच जनतेची मागणी आहे.
ताज्या अपडेटसाठी वाचा – RJ News 27 मराठी