चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिक आनंदी; यवत पोलिसांची मोठी कामगिरी
यवत (ता. दौंड) – यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित आरोपींकडून हस्तगत करून सर्व फिर्यादींना परत देण्यात आला आहे, अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून यवत पोलीस स्टेशन हद्दीत विविध जबरी चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपींचा एमओबी (मोस्ट ऑफेंडर बुक) नुसार तपास करत त्यांना अटक केली. या तपासात पोलिसांनी एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यामधील चोरी गेलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल तसेच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी यवत पोलिसांनी हा सर्व जप्त मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून अधिकृतरित्या सुपूर्त केला. चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अनेकांनी यवत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
ही संपूर्ण कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, किशोर वागज, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे आणि त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.
यवत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षा व विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे.