गणेगाव दुमला येथे रानगव्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांत भीतीचं वातावरण
शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमला येथे सोमवारी सकाळी एक अनपेक्षित घटना घडली. गावातील एक शेतकरी सकाळच्या सुमारास गावात जात असताना त्याला रानगवा दिसला. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
याच दिवशी दुपारी राजेंद्र शिंदे यांच्या शेतात कांदा काढणीचे काम सुरू असताना संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन रानगवे उसाच्या शेतातून बाहेर येताना काही कामगारांनी पाहिले. अचानक दिसलेल्या या जंगली प्राण्यांमुळे स्त्रिया आणि कामगार घाबरून गेले. आवाज आणि गोंधळ झाल्याने ही बाब उघडकीस आली.
या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा काढणीसाठी काम करणारे मजूर येण्यास तयार नाहीत. यामुळे शेतीची कामे थांबण्याची वेळ आली आहे. विशेषतः शेतांमध्ये एकट्या घरांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे.
गावातील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वन विभागाचे काही कर्मचारी देखील आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. आधीच गावकऱ्यांवर बिबट्याच्या भीतीचं सावट आहे, त्यात आता रानगव्याच्या आगमनाने धोक्याचं प्रमाण अधिक वाढले आहे.
या सर्व परिस्थितीमध्ये वीजपुरवठाही नियमित नाही. लोडशेडिंगमुळे २४ तास वीज नसते. पुरुष वर्ग कामासाठी बाहेर गेला असता महिलांनी, वृद्धांनी आणि लहान मुलांनी या धोक्याच्या वातावरणात कसे राहावे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चोरट्यांचा, बिबट्याचा आणि आता रानगव्याचा धोका वाढत चालला आहे. उद्या आणखी कोणता वन्यप्राणी गावात शिरेल याचा नेम नाही.
ग्रामस्थांनी सरकार आणि वन विभागाचे लक्ष वेधत तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अशी सामूहिक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.