शंभो महादेव यात्रेला नागरगाव येथे उद्यापासून सुरुवात
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्सवाची रंगतदार सुरुवात
– विजय कांबळे, प्रतिनिधी
नागरगाव (ता. शिरूर, जि. पुणे):
नागरगाव येथील ग्रामदैवत शंभो महादेव यांच्या वार्षिक यात्रेला बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात प्रारंभ होणार आहे. या यात्रेला ग्रामस्थ, भाविक आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत शंभो महादेवास अभिषेक विधीपूर्वक केला जाईल. मंदिर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, संपूर्ण गाव पावन वातावरणात न्हालेला दिसणार आहे.
सायंकाळी ६ वाजता शेरणी वाटप व मानाची पालखी मिरवणूक पार पडेल. यानंतर रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत छबिना मिरवणूक, आकर्षक शोभेचे फटाके व दारूगोळा प्रेक्षकांच्या आनंदात भर घालतील. रात्री ११ ते १ या वेळेत साहेबराव नांदवळकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी, गुरुवार १ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते १ यावेळी साहेबराव नांदवळकर तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ ते ६ या वेळेत पारंपरिक कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार असून, कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे. सायंकाळी ६ वाजता विडा वाटपाचा कार्यक्रम होईल.
रात्री ९ ते १ या वेळेत राष्ट्रपती पुरस्कार विजेती मंगला बनसोडे व नितिनकुमार बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला असून, यात नाट्य, गीत-संगीत, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख समावेश असणार आहे.
या यात्रेचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन समस्त यात्रा कमिटी व नागरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.