मळगंगा देवीच्या श्रींच्या घागर मिरवणुकीस लाखोंचा जनसागर; आसमंतात फुलांचा वर्षाव अन् भक्तीची उधळण
प्रतिनिधी : शिरूर
देवतेवर अढळ श्रद्धा आणि भक्तिभावाचा महासागर यांचे साक्षीदार ठरले निघोज गावचे आजचे क्षण… राज्यातील जागृत आणि चैतन्यशील देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या श्रींच्या घागर मिरवणुकीसाठी लाखो भाविकांची मांदियाळी जमली आणि संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालं.
मंगळवार, २२ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता निघोज ग्रामस्थ आणि देशभरातून आलेल्या भाविकांनी देवीच्या पवित्र दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात केली. देवीच्या पालखीचा शुभारंभ होताच, एक वेगळीच दिव्यता आसमंतात पसरली.
सकाळी साडेसात वाजता गावकऱ्यांनी, मानकऱ्यांनी व संतोष गायखे यांच्या हस्ते देवीच्या घागरीची विधीवत पूजा करण्यात आली. नंतर देवीच्या जयजयकाराने आसमंत दणाणून गेला. घागर मिरवणूक सुरु झाली आणि श्रद्धेचा महासागर बारवेतून गावभर लाटांप्रमाणे पसरला.
या मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. शेकडो महिला पितळी आणि विविध धातूच्या कळशा डोक्यावर घेत, भक्तिगीत गात, डोळ्यांत श्रद्धा आणि मुखावर आनंद घेऊन मिरवणुकीच्या मागे पुढे चालल्या होत्या.
मुख्य पेठेतील प्रत्येक गच्ची, दरवाजा, माळवा आणि गॅलरी भाविकांनी भरून गेला होता. लोक सकाळी सात वाजल्यापासूनच घागर दर्शनासाठी ताटकळले होते. देवीच्या घागरीवर फुलांचा आणि रेवड्यांचा वर्षाव करत, ‘जय मळगंगा माते’च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमत होता.
या वर्षी प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने देवीच्या घागर व मंदिरावर मनसोक्त पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून उधळलेले रंगीबेरंगी फुलांचे वर्षाव दृश्य इतके मनोहारी होते की, अनेक भाविकांचे डोळे पाणावले.
मिरवणूक जुनी पेठेतून देवीच्या मंदिरात पोहोचल्यावर, पुजारी संध्या गायखे, सुवर्णा गायखे, सारिका गायखे, रुपालीताई गायखे यांच्या हस्ते घागरीचे औक्षण झाले. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट आणि देवीच्या जयजयकाराचा प्रचंड गजर घुमत होता.
यानंतर घागर परत बारवेत विसर्जित झाली. या विधीला उपस्थित लाखो भाविकांनी डोळे भरून पाहिलं. प्रत्येकाच्या मनात देवीच्या दर्शनाने एक अनोखा समाधान आणि पुण्यभावना दाटून आली.
दुपारी गावाच्या प्रमुख चौकातून ८५ फूट उंच काठी व पालखी मिरवणूक निघाली आणि त्यानंतर जगप्रसिद्ध रांजणखळग्याच्या कुंड यात्रेची भव्य सुरुवात झाली. कुंड परिसर आजही पारंपरिक खेळणी, शेती साहित्य आणि मिठाई विक्रेत्यांनी गजबजला होता.
भाविकांनी देवीला सवाष्णी कार्यक्रमात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. गुळाचा प्रसाद वाटपही झाला. यात्रेच्या दरम्यान झालेल्या कुस्त्यांच्या हगाम्याला हजारोंचा जल्लोष लाभला.
पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, वीज वितरण आणि पाणी पुरवठा विभागाने चोख व्यवस्था केल्यामुळे यात्रेकरूंचा उत्सव अधिकच सुखकर झाला. निघोज ग्रामपंचायतीने २४ तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राखला. यामुळे प्रत्येक भाविकाने समाधान व्यक्त केलं.
खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते सर व इतर मान्यवरांनी देवीचे दर्शन घेऊन गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने दर्शन रांगेची सुंदर व्यवस्था करून लाखो भाविकांना शिस्तबद्ध दर्शनाचा लाभ मिळवून दिला.
या यात्रेचा गौरवशाली इतिहास अजूनही टिकून आहे. विविध समाजांना दिलेले परंपरागत मान जतन केले जात आहेत, आणि त्यामुळे ही यात्रा सर्वसमावेशक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरली आहे.
देवी मळगंगा मातेच्या आशीर्वादाने भक्तीचा महासागर उचंबळला, आणि लाखो श्रद्धावानांच्या मनात सुख, समाधान व भक्तिरसाची गंगा अविरत वाहू लागली…