पाटस टोल प्लाझावर ईएसआयसी नोंदणी व दुरुस्ती शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस (ता. दौंड) : कर्मचारी कल्याण आणि त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलत, पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे आणि मार्को लाईन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटस टोल प्लाझा येथे बुधवार, २३ एप्रिल २०२५ रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास कर्मचाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
या शिबिरात ईएसआयसीची नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच आधीच नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना वेळ आणि त्रास वाचवता आला, तसेच त्यांच्या विमा योजनांबाबत सुस्पष्टता प्राप्त झाली.
कार्यक्रमाला पुणे-सोलापूर एक्सप्रेस वेचे प्रोजेक्ट हेड फनी कुमार मुला, एचआर मॅनेजर राजेश सिंग, मार्कोलाईनचे प्रोजेक्ट मॅनेजर संदीप लावरे व धर्मा शेळके, पाटस टोल प्लाझाचे मॅनेजर प्रवीण कांबळे, सिस्टीम मॅनेजर समाधान पवार, टोल मॅनेजर कमलेश पाटणे, असिस्टंट मॅनेजर इरफान शेख, एचआर मॅनेजर विठ्ठल सरडे, तसेच डॉक्टर स्वप्नील चव्हाण आणि डॉक्टर निंबाळकर यांची उपस्थिती होती. बारामती, दौंड व कुरकुंभ येथील कर्मचारीही विशेषतः या शिबिरासाठी आले होते.
या उपक्रमाचे कौतुक करत फनी कुमार मुला यांनी सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे शिबिर अत्यंत आवश्यक होते. अशा उपक्रमांद्वारे कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास अधिक दृढ होतो.” एचआर मॅनेजर राजेश सिंग यांनी कंपनीतर्फे अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटस टोल प्लाझाचे मॅनेजर प्रवीण कांबळे यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी सर्व सुविधांची योग्य व्यवस्था करून शिबिर सुरळीत पार पाडले. कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
हा उपक्रम केवळ कागदोपत्री प्रक्रिया नव्हे, तर कर्मचारी कल्याणाच्या दिशेने घेतलेले ठोस पाऊल ठरले. अशा उपक्रमांनी कार्यस्थळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कर्मचारी व्यवस्थापन सुसंवाद वाढीस लागतो.