नलगेमळा (शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९५ वर्षीय आजीचा मृत्य
शिरूर, ता. २५ एप्रिल २०२५
शिरूर तालुक्यातील नलगेमळा (इनामगाव) गावात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ९५ वर्षीय लक्ष्मीबाई बबन भोईटे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४:४० ते सकाळी ६:३० या वेळेत घडली. माहितीप्रमाणे, लक्ष्मीबाई आपल्या घराच्या पेंडवीत झोपलेल्या असताना अचानक बिबट्याने त्यांच्या गळ्याला पकडले आणि फरफटत घरामागील ऊसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी त्यांच्या मुलगा शंकर बबन भोईटे व पत्नी कांचन घरात झोपले होते.
आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून शंकर भोईटे यांनी दरवाजा उघडून बाहेर येऊन पाहिले असता, बिबट्या त्यांच्या आईला फरफटत नेत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र बिबट्या लक्ष्मीबाईंना शेतामध्ये घेऊन गेला. शंकर यांनी तात्काळ गावातील राहुल बाळासाहेब नलगे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली.
सकाळी ६:३० वाजता लक्ष्मीबाई भोईटे यांचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. मृतदेहाचा फक्त धड सापडला असून, डोके मिळून आले नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह न्हावरा ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी नेण्यात आला आहे.
या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये CR No. 50/2025, बीएनएस कलम 194 अंतर्गत करण्यात आली असून, याबाबत खबर शंकर बबन भोईटे (वय ५२, व्यवसाय शेती, रा. नलगेमळा, इनामगाव, ता. शिरूर) यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (बॅ. क्र. २४६३) करत आहेत. सदर नोंद पोलीस हवालदार उबाळे (बॅ. क्र. १८९८) यांनी दाखल केली.
या घटनेमुळे नलगेमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.