इनामगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
इनामगाव (ता. शिरूर) :v
येथील एका दुर्दैवी घटनेत शुक्रवारी (दि. २५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लक्ष्मीबाई भोंडे (वय अंदाजे ७० वर्षे) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. झोपेत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत त्यांना फरपटत नेले. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ शोधमोहीम राबविली. स्थानिकांच्या मदतीने काही वेळातच लक्ष्मीबाई भोंडे यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, माडवगण फाटा परिसरात याआधीही अशाच प्रकारचे हल्ले घडले आहेत. यापूर्वी दोन, पिंपळसुटी येथे एक व तीन लहान बालकांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लक्ष्मीबाई भोंडे यांचा मृत्यू ही या भागातील चौथी दुर्दैवी घटना ठरली आहे.
सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या सतत वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने कडक उपाययोजना राबवण्याची तसेच बिबट्याला पकडण्यासाठी अधिक तीव्र प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
वनविभागानेही या घटनांची गंभीर दखल घेत लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी जाळे टाकणे व गस्त वाढवण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती दिली आहे.