June 20, 2025 9:13 am

न्हावरे येथे ‘शासन आपल्या दारी’ आणि जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

न्हावरे येथे ‘शासन आपल्या दारी’ आणि जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे | प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
न्हावरे येथे “शासन आपल्या दारी” हा उपक्रम व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ संपन्न झाला. हा कार्यक्रम घोडगंगा सहकारी साखर कारखान्याजवळील मंगल कार्यालयात पार पडला. उद्घाटन शिरूर-हवेलीचे आमदार व मराठी भाषा समितीचे सदस्य लोकनेते माऊली आबा कटके यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी तृप्तीताई सरोदे (सचिव, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस), तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, उपजिल्हाधिकारी पुनमताई आहेरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सहकार, महसूल, कृषी, आरोग्य, जलसंपदा, महावितरण, महिला व बालकल्याण आदी विविध विभागांनी नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ निर्णय घेतले. कृषी विभागामार्फत कै. जीवन संजय नागवडे (बाभुळसर बुद्रुक) यांचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा क्लेम देण्यात आला, तर महावितरणच्या समस्यांवर आमदार कटके यांनी तातडीने आदेश दिले.

जनसंपर्क कार्यालयाच्या प्रास्ताविकात सुधीर फराटे यांनी घोडगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या ३३७ कोटींच्या प्रस्तावाची माहिती दिली. साखर आयुक्तांनी यासाठी ३२५ कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पुढे पाठवला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेतल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.

रवी बापू काळे यांनी चासकमान व भामासखेड प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे, तसेच वीज समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली. अध्यक्षीय भाषणात आमदार कटके यांनी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे सांगितले. एजंटांच्या त्रासापासून नागरिकांची मुक्तता व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

घोडगंगा साखर कारखाना लवकरच सुरु होणार असून त्यासाठी मंजूर सव्वा तीनशे कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित होईल, अशी ग्वाही आमदार कटके यांनी दिली. साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, फक्त पावसाळ्यातील ओव्हरफ्लो पाणीच उपसले जाईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही.

 

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आकाश वडगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र कोरेकर यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें