खाऊसाठी साठवलेल्या पैशातून स्वच्छता दूतास दिला नवीन गणवेश – पिंपरी दुमाल्यातील विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम
पिंपरी दुमाला, ता. शिरूर – स्वच्छतेचे कार्य करत असलेल्या एका युवकास इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशांतून नवीन गणवेश भेट देत सामाजिक मूल्यांचा एक प्रेरणादायी संदेश दिला. जिल्हा परिषद शाळा, पिंपरी दुमाला येथील विद्यार्थ्यांनी आपल्याला शाळेत शिकवलेले नैतिक आणि सामाजिक शिक्षण प्रत्यक्षात उतरवत एक वेगळीच उदाहरण घालून दिले.
शाळेच्या व गावाच्या परिसरात गेल्या वर्षभरापासून स्वच्छतेचे काम निःस्वार्थपणे करत असलेले युवक किरण चिखले हे शाळेतील पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता आणि अन्य कामे नियमितपणे पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, ते दृष्टिदोषामुळे दिव्यांग असूनही आपल्या कामात कुठलाही कमीपणा न ठेवता सातत्याने सेवा देत आहेत.
अलीकडेच शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी साठवलेले पैसे एकत्र करत शाळेतील स्वच्छता दूत किरण चिखले यांना नवीन गणवेश भेट देण्याची इच्छा शिक्षकांसमोर व्यक्त केली. ही इच्छा संमतीने पूर्ण करण्यात आली आणि किरण यांना सप्रेम नवीन गणवेश भेट देण्यात आला.
या उपक्रमात प्रेम खळदकर, ओम जाधव, राजवीर जगताप, आदर्श खेडकर, समर्थ चिखले, सोहम खेडकर, रितेश सोनवणे, यश कळसकर, शिवम चिखले, विहान गायकवाड, आराध्या चिखले, दिव्या डोळस, ओवी चिखले, समीरा चिखले, प्रांजल डोळस या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या व अनेक महिन्यांपासून नवीन कपड्यांपासून वंचित असलेल्या किरण चिखले यांना हा गणवेश मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ भेटीने ते भावविवश झाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता.
विद्यार्थ्यांच्या या संवेदनशीलतेचे व सामाजिक जाणीवेचे वर्गशिक्षक कांताराम शिंदे, मुख्याध्यापक राहुल चातुर, आणि केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे यांनी भरभरून कौतुक केले असून, हा उपक्रम संपूर्ण गावासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी फक्त सामाजिक जबाबदारी नव्हे तर माणुसकीचीही शिकवण समाजाला दिली आहे.