संदेश केंजळे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी
गहाळ झालेले ३५ मोबाईल मूळ मालकांना परत करणार
शिरूर प्रतिनिधी- रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील विविध भागांमधील नागरिकांचे मोबाईल फोन २०२४ ते २०२५ या कालावधीत चोरीस गेले होते किंवा गहाळ झाले होते. या गहाळ मोबाईल फोनचा माग काढण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनने तांत्रिक विश्लेषण व सायबर ट्रॅकिंगचा उपयोग करून अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येत, तब्बल ३५ मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले आहे.
या मोबाईल फोनचा मूळ मालकांपर्यंत परतावा करण्यासाठी २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत मूळ धारकांना मोबाईल सुपूर्त करण्यात येणार आहेत.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, “गहाळ मोबाईल फोन मिळवण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारींची योग्य दखल घेण्यात आली. तांत्रिक पद्धतीने आणि सायबर क्राईम युनिटच्या सहाय्याने हे मोबाईल शोधले गेले. आमचे ध्येय म्हणजे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून देणे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढेल, तसेच अशा चोऱ्यांना आळा बसण्यासाठी जनजागृतीही होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सूचना: ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते व ज्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यांनी आपली ओळख पटवणारे कागदपत्र घेऊन शिरूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.