जालना जिल्ह्याचा अभिमान – आदित्य क्रिस्टोफर मोझेस यांची IIM दुबईच्या पहिल्या संचालकपदी नियुक्ती
कधी-कधी एक निर्णय केवळ करिअरची दिशा बदलत नाही, तर संपूर्ण समाजासाठी नवी प्रेरणा ठरतो. जालना जिल्ह्यातील मिशन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. क्रिस्टोफर मोझेस आणि डॉ. शोभा मोझेस यांचे सुपुत्र प्रा. आदित्य क्रिस्टोफर मोझेस यांनी असेच एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
IIM अहमदाबाद येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आदित्य मोझेस आता IIM दुबई ग्लोबल कॅम्पसचे पहिले संचालक (Director) म्हणून नियुक्त झाले आहेत. ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर जालन्यासह संपूर्ण भारतासाठी गौरवाची बाब आहे.
जालना सारख्या शहरातून शिक्षण घेऊन, पुढे देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होऊन, आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिक्षणाचा डंका वाजवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारतीय शिक्षणसंस्थांचा दर्जा आणि कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत IIM दुबई कॅम्पससारख्या जागतिक मंचावर नेतृत्व करणारे आदित्य मोझेस हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे