संकष्टी चतुर्थी उत्साहात साजरी – बाभुळसर बुद्रुक
प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी | दि. १६ एप्रिल | बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे)
बाभुळसर बुद्रुक गावातील सिद्धिविनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीचा पवित्र सण मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भक्तांची वर्दळ पाहायला मिळाली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील आदर्श सरपंच सौ. दिपालीताई महेंद्र नागवडे, माजी उपाध्यक्ष (शाळा व्यवस्थापन समिती) श्री. महेंद्र हनुमंत नागवडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषाताई सोमनाथ नागवडे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सोमनाथ नवनाथ नागवडे यांना श्री सिद्धिविनायकाची आरती करण्याचा मान बहाल करण्यात आला. मंदिरात आरतीच्या वेळी मंगल वाद्यांच्या गजरात व “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते.
आरतीनंतर ग्रामस्थांसाठी फराळाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. खिचडीचा प्रसाद सर्वांना वितरित करण्यात आला. महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गणेश भक्तांची सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित होऊन अनेक स्वयंसेवकांनी नियोजनात सक्रीय सहभाग घेतला. स्वच्छता, प्रसाद वितरण, वाहतूक व्यवस्थापन यासारख्या विविध बाबतीत त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचा मोठा वाटा असून, त्यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे, भक्तांचे व पाहुण्यांचे मन:पूर्वक आभार मानले. धार्मिक एकतेचा आणि सामाजिक सहभागाचा सुंदर आदर्श बाभुळसर बुद्रुक गावाने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उभा केला आहे.