शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई – रिलायन्स जिओच्या गोडाऊनमधून ५.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ६ आरोपी अटकेत
शिक्रापूर (ता. शिरूर) – रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनमध्ये भिंत फोडून केलेल्या चोरीप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी सहा जणांच्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावत तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई दि. ४ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
घटना कशी घडली?
दि. ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स जिओच्या गोडाऊनच्या मागील भिंतीला होल करून आत प्रवेश केला. तेथून चोरट्यांनी ३५२५ मीटर कॉपर केबल (किंमत ₹२,४६,७५०), ५ केबल कनेक्टर्स (किंमत ₹१२,५००) आणि १० बॅटऱ्या (किंमत ₹३,००,०००) असा एकूण ₹५,५९,२५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी नितीन गोपाळा भोर (वय ४०, रा. वाघोली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.
तांत्रिक तपासातून आरोपींना गजाआड
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने शिक्रापूरसह जातेगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा, लोणीकंद व वाघोली परिसरात तपास चोखपणे राबवला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांची माहिती यावरून चोरट्यांनी गुन्ह्यासाठी एक लाल युनिकॉर्न दुचाकी आणि एक टेम्पो वापरल्याचे निष्पन्न झाले.
या तपासाआधारे खालील सहा आरोपींना अटक करण्यात आली:
1. आलम युनुस मनीयार (३४) – रा. गायकवाडनगर, पुनवळे, पुणे
2. अनिल लखीराम गुप्ता (३९) – रा. येरवडा, पुणे
3. विरेंदर जाटाव (२७) – रा. पुनवळे, पुणे (मुळगाव – राजस्थान)
4. विशाल पप्पू कश्यप (१९) – रा. धानोरी, पुणे (मुळगाव – उत्तरप्रदेश)
5. शिवम बजरंगी कश्यप (२२) – रा. धानोरी, पुणे (मुळगाव – उत्तरप्रदेश)
6. शामजी चिकनू यादव (२४) – रा. पुनवळे, पुणे (मुळगाव – उत्तरप्रदेश)
या सर्व आरोपींकडून चोरीस गेलेल्या १० बॅटऱ्या (₹३ लाख किंमत), गुन्ह्यात वापरलेला टेम्पो व युनिकॉर्न दुचाकी असा एकूण ₹९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस तपासाची उल्लेखनीय कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, उपनिरीक्षक महेश डोंगरे, तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल नलगे यांनी मिळून केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने करत आहेत.