कबड्डी मॅट आणि क्रीडा साहित्याने श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेला नवे बळ – विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्वप्नांना नवे पंख
मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) –
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या श्री वाघेश्वर विद्याधाम व ज्युनिअर कॉलेज, मांडवगण फराटा या प्रशालेस नुकतेच 9.70 लाख रुपये किमतीचे कबड्डी मॅट व 3.50 लाख रुपये किमतीचे इतर क्रीडा साहित्य प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कौशल्यांना चालना देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा शाळेसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.
सुमारे 1800 ते 2000 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेस सन 2022-23 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे कबड्डी मॅट साठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावास मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून साथ दिली. या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक आराखडा व नविन्यपूर्ण योजना (सर्वसाधारण) अंतर्गत हे साहित्य मंजूर झाले.
साहित्य मंजुरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री राजाभाऊ कोळी, तसेच श्री राजीवदादा देवकाते यांचे सहकार्य मोलाचे ठरले. दोन ते तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2024-25 या शैक्षणिक वर्षात हे साहित्य प्रत्यक्षात शाळेत दाखल झाले.
या यशस्वी उपक्रमामागे प्राचार्य श्री रामदास चव्हाण, उपप्राचार्य श्री गणपत बोत्रे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामभाऊ सासवडे, शिवसेना उपतालुका प्रमुख पै. माऊली अप्पा फराटे, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुरेशभाऊ ढमढेरे, क्रीडा शिक्षक श्री दादासाहेब उदमले व श्री मल्हारी उबाळे यांचे अथक प्रयत्न आहेत.
क्रीडा साहित्य प्राप्तीच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीरशेठ फराटे, उपसरपंच श्री अमोल शितोळे, उपाध्यक्ष कालिदास चकोर, सुरेश सोनवणे, बारकू येवले, राजेंद्र कांबळे, संतोष परदेशी सर, तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक क्रीडा साहित्याच्या मदतीने अधिक चांगले प्रशिक्षण घेता येणार असून, शाळेचे क्रीडा क्षेत्रातील योगदान निश्चितच अधिक प्रभावी होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.