मांडवगण फराटा येथून मोटारसायकल चोरी; शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मांडवगण फराटा, ता. शिरूर – येथील बाजार मैदानासमोरून एका शेतकऱ्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
याबाबत हणुमंत गोविंद होले (वय ६७, व्यवसाय शेती, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते बाजार करण्यासाठी मांडवगण फराटा येथील बाजार मैदानासमोर आले होते. त्यांनी आपली हीरो स्प्लेंडर प्लस (क्र. एम.एच.१२ क्यु.व्ही. ३२६६, काळ्या रंगाची) मोटारसायकल मैदानासमोर लावली होती.
बाजार आटोपून सायंकाळी पाचच्या सुमारास परत आल्यावर मोटारसायकल त्या ठिकाणी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात व वडगाव रासाई, तांदळी, बाभुळसर या गावांमध्ये शोध घेतला; परंतु कुठेही ती सापडली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2025, भारतीय दंड संहिता कलम 303(2) (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेली मोटारसायकल अंदाजे २० हजार रुपये किमतीची असून, तिचा चॅसी क्रमांक MBLHAR071JHH14470 व इंजिन क्रमांक HA10AGJHH20551 असा आहे.
या गुन्ह्याचा तपास पो.ह. 2463 शिंदे करत असून, दाखल करणारे अधिकारी पो.ह. 2214 वाघमोडे आहेत. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. संदेश केंजळे हे करत आहेत.
ग्रामीण भागात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.