पिस्तुलचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न; शिरूर येथे एकावर गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी) – दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शिरूर तालुक्यातील करडे गावात जमीन व्यवहारात उधारीचे पैसे न दिल्याच्या कारणावरून एका इसमाने पिस्तुलचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश दत्तात्रय रोडे (वय 41 वर्ष, व्यवसाय – शेती व प्लॉटींग, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या राहत्या घरासमोर उभे असताना आरोपी दिपक संपत नवले (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) याने ५०,००० रुपये न दिल्याच्या कारणावरून चिडून जाऊन हातात पिस्तुल घेऊन “थांब तुला गोळ्या घालतो, मारूनच टाकतो” असे म्हणत पिस्तुल उगारले. त्यावेळी आरोपीने पिस्तुलाचा ट्रिगर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी यांनी प्रसंगावधान राखून त्याचा हात बाजूला ढकलला आणि जीव वाचवला.
या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 109, 351 (2)(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 आणि आर्म्स ऍक्ट 3, 25 नुसार गुन्हा (गु. र. नं. 242/2025) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी PSI झेडगे मॅडम यांनी फिर्याद दाखल करून घेतली असून, तपास PSI शेळके सर करत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. केंजळे हे कार्यरत आहेत.
तसेच, आरोपी दिपक नवले याच्यावर यापूर्वी देखील गु.र. नं. 386/2020 अंतर्गत भा.दं.वि. 326, 324 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (चॅप्टर केस नं. 386/2020, कलम 107) देखील करण्यात आलेली आहे.