वडगाव रासाई येथील भीषण आगीत ऊसतोड कामगाराचे सर्वस्व जळून खाक – मदतीचे आवाहन
Lशिरूर तालुक्यातील वडगाव रासाई हे ऊस उत्पादनासाठी
ओळखले जाणारे गाव, जेथे अनेक भागांतून ऊसतोड कामगार हंगामी स्वरूपात येत असतात. भीमा नदीच्या जवळील सुपीक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. त्यामुळे येथे गुऱ्हाळे आणि इतर ऊस प्रक्रिया केंद्रे भरपूर आहेत, ज्यासाठी ऊसतोड मजुरांची सतत गरज भासत असते. अशाच कामासाठी वडगाव रासाई येथे आलेल्या एका ऊसतोड मजुराच्या झोपडीत आग लागून मोठे नुकसान झाले.
संबंधित घटनेत साहेबराव जगन राठोड हे संभाजीनगर जिल्ह्यातील पारोळा, वैजापूर येथून आपल्या कुटुंबासह वडगाव रासाई येथे ऊसतोडीसाठी आले होते. त्यांनी १० एप्रिल रोजी आपल्या कुटुंबासाठी एक झोपडी उभारली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी, सुमारे १० वाजेच्या सुमारास, त्यांच्या झोपडीजवळ असलेल्या विजेच्या खांबात शॉर्ट सर्किट झाल्याने आगीची मोठी घटना घडली.
साहेबराव राठोड व त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी कामासाठी गेलेले असताना ही घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत त्यांच्या झोपडीत ठेवलेली एक धान्याची गोणी, नवे कपडे, झोपण्यासाठी लागणाऱ्या गोधड्या व इतर सर्व आवश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीचा जोर प्रचंड असल्याने त्यात यश आले नाही. सुदैवाने, झोपडीत असलेला रिकामा गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीत साहेबराव राठोड यांचे अंदाजे पंधरा ते सोळा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रोजच्या गरजेच्या सर्व वस्तू गमावलेल्या या कुटुंबाची सध्या परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे.
घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेले पत्रकार म्हणाले, “मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. एक सामान्य माणूस जे घरातून सोबत घेऊन येतो ते सर्वच आगीत नष्ट झाले. त्यामुळे मी सर्व समाजाला, प्रशासनाला आणि सामाजिक संस्थांना विनंती करतो – कृपया या कुटुंबास मदतीचा हात द्या. जेवढे शक्य आहे तेवढी मदत करून या कुटुंबाला नव्याने उभे राहण्यास मदत करावी.”
सध्या हे कुटुंब वडगाव रासाई येथे तीन मोबाईल टॉवरच्या जवळ राहत आहे. कोणालाही मदतीसाठी पुढे यायचे असल्यास तेथे जाऊन थेट संपर्क साधता येईल.
आपली थोडीशी मदतही त्यांच्या पुनर्वसनासाठी फार मोठी ठरेल.sß