महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य महिला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
शिरूर ( शिक्रापूर ) : समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक भव्य आणि प्रेरणादायी राज्यस्तरीय महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी रेझिडेंसी, चाकण रोड, शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे पार पडणार असून, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा पुरस्कार सोहळा रश्मिल बहुद्देशीय सामाजिक संस्था, सपणवाडी, पुणे व सौ. रीना सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार असून, संस्थेचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार विश्वनाथ घोडके हे प्रमुख संयोजक आहेत. कार्यक्रमासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीप रत्न गायकर, सरपंच निलमलक्ष्मी नवले, अर्धवट महिला संघटना खडकी पुणेच्या अध्यक्षा, अँड. अनिता पवार, अंकित कुमार गीते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात राज्यभरातून विविध क्षेत्रांत अपूर्व कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्तव्यनिष्ठ स्टाफ ऑफिसर ज्योती रमेश बनसोडे यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत आयोजकांनी त्यांचा गौरव निश्चित केला आहे.
या पुरस्कारांची निवड मीनाताई साळे, संजिवनी वाघमारे, आरती भुजबळ, समाईता भावसार, सुचेता उपाध्ये, रेखा कळंबे यांच्या समितीने केली आहे. कार्यक्रमात रश्मी वारणेकर, पूजा वाणखेडे, ममुर करंडे, वंदना भुजबळ, राहुलदादा पाटील, मोनिकाताई हरगुडे, रूपालीताई देरेकर, दीपालीताई नागवडे, राजेंद्र देरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
NDMJ राज्य महिला संघटक कु. पंचमलता व कु. कुंभार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून, सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, साहित्यिक तसेच इतर क्षेत्रांत केलेल्या भरीव कार्याचा गौरव होणार असून, हा सन्मान त्यांच्यासाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली आहे.