तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे यांना जिल्हास्तरीय कोडींग प्रशिक्षक पुरस्कार
शिरूर तालुक्यातील जि.प. शाळा पिंपरी दुमाला येथील तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे यांना “जिल्हास्तरीय कोडींग प्रशिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद आयोजित कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा बहुमान प्राप्त झाला.
हा गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), ॲमेझॉन फ्यूचर इंजिनिअर टीचिंग एक्सलन्स, तसेच लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये कोडींग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात शिरूर तालुक्यातून कांताराम शिंदे यांची मेंटॉर टीचर म्हणून निवड करण्यात आली होती. वर्षभर चाललेल्या या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अनेक शिक्षकांना कोडींग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी अस्मिना मोमीन, सुनील गच्चे, अधिव्याख्याता वैशाली बच्छाव, संस्था संचालक साईप्रसाद साले, व्यवस्थापक तुकाराम लाळगे, प्रकल्प सहाय्यक श्रुती कुलकर्णी, महेश मेत्रे, प्रदीप शिंदे, विशाल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कांताराम शिंदे यांनी यापूर्वी देखील पुणे जिल्हा परिषदेचा तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार, तसेच व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या सृजनशीलतेचा ठसा उमटवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल DIET पुणेचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी किसान खोडदे, केंद्रप्रमुख यशवंत रणदिवे, तसेच मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
कांताराम शिंदे यांचा हा सन्मान ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून डिजिटल शिक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण करणारा आहे.