साकळाई उपसा योजनेला जोरदार विरोध; शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार
प्रतिनिधी – शिरूर
शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या विरोधात आज चिंचणी येथे भव्य शेतकरी सभा पार पडली. या सभेत शेकडो शेतकरी एकवटले असून, सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात आवाज उठवला.
या योजनेविरोधात १ एप्रिल २०२५ रोजी शिरूरचे तहसीलदार श्री. बाळासाहेब म्हस्के यांना शिवसैनिक अनिल पवार, योगेश ओव्हाळ पाटील, संतोषराव काळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवरच ही आजची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या मते, घोड धरण हे रांजणगाव, करडे, कारेगाव, MIDC क्षेत्र तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्या धरणावर अवलंबून असलेल्या लाभार्थ्यांना डावलून साकळाई उपसा योजना लादली जात आहे. ही योजना पूर्णपणे अन्यायकारक असून शेतकऱ्यांचे जीवन अडचणीत येणार आहे, असा आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत सरकारने जर ही योजना जबरदस्तीने लागू केली, तर शेतकरी जेलभरो आंदोलन, रास्ता रोको आणि कायदेशीर लढाई उभी करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले की, पाण्याचा प्रश्न हा जीवन-मरणाचा आहे आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली आहे.
या बैठकीस बाळासाहेब घाडगे, नरेंद्र माने, एकनाथ आबा वाळुंज, सुभम नवले, संजय आबा काळे, संदीप नवले, श्रीनिवास घाडगे, राकेश पाचपुते, विठ्ठलराव काकडे, शामराव पवार, दादासो पवार, राजेंद्र पवार, सुनील गायकवाड, शहाजी गायकवाड, प्रकाश पवार, सुमन वाळुंज, अनिल सुभेदार पवार, राम जेऊघाले, नामदेव पवार, बाळासाहेब पवार, अशोक पवार, संतोष लगड, माऊली नागावडे यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे की, साकळाई उपसा योजना रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि पाण्याच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल.