उगम गरीबीतून… झेप अभिनयाच्या शिखराकडे!
नागेश पाटोळे यांची प्रेरणादायी यशोगाथा
माडवगण फराटा (ता. शिरूर) येथील युवक नागेश अनिल पाटोळे यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून यशाचा मार्ग गाठत सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण मांडले आहे. अवघे २३ वर्ष वय असलेले नागेश सध्या पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिकत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. वडील अनिल लक्ष्मण पाटोळे हे गवंडी काम करत असून, आई मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
नागेश यांनीही लहानपणापासूनच घराला हातभार लावण्याचे ठरवले होते. त्यांनी चार-पाच वर्षे किराणा दुकानात काम केले तसेच वेळोवेळी गवंडी कामही शिकले. काही काळ स्वतःचा भाजीपाला व्यवसायही सुरू केला, परंतु शिक्षणाच्या गरजेमुळे तो थांबवावा लागला.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड मनात बाळगणाऱ्या नागेश यांनी टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर छोटे व्हिडिओ तयार करून सुरुवात केली. त्यातूनच त्यांची अभिनयाकडे ओढ वाढत गेली. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
यानंतर नागेश यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी ‘एक नंबर बिलंदर’ या वेब सिरीजमध्ये पांडू हवालदार, तर ‘बळीराजा’ या सिरीजमध्ये मुख्यमंत्री साहेबांचे पीए अशी दमदार भूमिका साकारली. याशिवाय स्टार प्रवाह वरील अनेक मालिकांमध्ये छोट्या पण लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. विशेषतः ‘हुकमाची राणी’ या मालिकेमधील भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
या यशस्वी प्रवासाबद्दल नागेश पाटोळे यांचा नुकताच गावात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मांडवगण फराटा गावातील मान्यवर डिके शितोळे, खंडेराव फराटे पाटील, कैलास साहेबराव फराटे, गणेश माणिकराव फराटे, दत्तात्रय सुदाम फराटे, शंकरराव विठ्ठलराव फराटे आणि राहुल बाळासाहेब फराटे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नागेश यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गरिबी, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घडलेली ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.