सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला ‘क्राफ्ट्समन ऑटोमेशन’चा हातभार – सीएसआर फंडातून चार वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण
शिरूर प्रतिनिधी
सणसवाडी (ता. शिरूर) येथील वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला उद्योगक्षेत्रातून महत्त्वपूर्ण मदत मिळाली असून, क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) चार नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम करून दिले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक उत्तम व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम वातावरण प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता ही शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम करत असते. ही गरज ओळखून क्राफ्ट्समन ऑटोमेशन कंपनीने “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या संकल्पनेतून पुढाकार घेत शाळेच्या विकासासाठी भरीव मदत केली. या कामामागची भावना स्पष्ट करताना, कंपनीचे एच. आर. प्रमुख सुदलाई पांडियन म्हणाले, “गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भौतिक सुविधा गरजेच्या आहेत आणि अशा उपक्रमांतून आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शक्य तितक्या सुविधा उभ्या करत राहू.”
कार्यक्रमात उपस्थित शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनीही जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता स्थानिकांच्या सहभागावर अवलंबून असते हे अधोरेखित करत, अशा शाळा आता कोणत्याही खासगी शाळांपेक्षा कमी नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, तसेच देशसेवा करणारे माजी सैनिक संदीप दरेकर, सचिन दरेकर, मच्छिंद्र दरेकर, आणि पत्रकार अमोल दरेकर यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांनी शाळेला प्रयोगशाळा साहित्य देण्याचे जाहीर केले.
या सोहळ्यात क्राफ्ट्समन ऑटोमेशनचे सुदलाई पांडियन, सचिन हरगुडे, पोलीस निरीक्षक गायकवाड, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी संचालक रामभाऊ सासवडे, दत्तात्रय हरगुडे, पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, सदस्य विजयराज दरेकर, समिती अध्यक्ष अमोल हरगुडे, पालक संघाचे उपाध्यक्ष रामदास हरगुडे, महेंद्र दरेकर, अंबादास गर्कल, तसेच बांधकाम ठेकेदार नंदकुमार कुंबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी केले, तर उत्कृष्ट सूत्रसंचालन भाऊसाहेब उचाळे यांनी केले.
हा उपक्रम केवळ शाळेच्या पायाभूत विकासापुरता मर्यादित नसून, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे खरोखरच ग्रामीण भागातही शैक्षणिक परिवर्तन घडवणे शक्य आहे.