आशेरी गडावरील पाच तोफांना लवकरच मिळणार तोफगाडे – ऐतिहासिक संवर्धनाचा नवा अध्याय
पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक अशेरी गडावर असलेल्या पाच तोफांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. डहाणू आणि मनोर वनविभागाच्या अधिकृत परवानगीने हा उपक्रम सध्या सुरू असून लवकरच या तोफांना तोफगाडे बसवले जाणार आहेत.
मराठ्यांच्या इतिहासात अनमोल स्थान असलेल्या अशेरीगडावर काल रामनवमीच्या निमित्ताने इतिहासाची पुनर्लेखन घडले. प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी मोहीमेत पाचव्या द्विभागीय तोफेचा एक भाग यशस्वीरित्या गडावर पोहचवण्यात आला. ही तोफ सहा फुटांची असून गड पायथ्यापासून ते गडमाथ्यापर्यंत अत्यंत कठीण अशा चढाईतून गडरक्षकांनी ती वाहून नेली.
शनिवार रात्री १ वाजता सुरू झालेल्या या धाडसी मोहीमेत ५५ गडरक्षकांनी सहभाग घेतला. यामध्ये दोन फळ्यांमध्ये विभागणी करून काम केले गेले. पहिल्या फळीने तोफेचा अग्रभाग गडमंदिराजवळ पोहचवला, तर दुसऱ्या फळीने तोफेचा मागचा भाग अर्ध्या टप्प्यावर ठेवला असून पुढील मोहिमेत तो पूर्णपणे गडावर स्थापण्यात येणार आहे.
या मोहिमेत दुर्गवेध युवा मराठा फाउंडेशन, दुर्गेश्वर प्रतिष्ठान, बोईसर फ्लायर्स, अखंड सेगवा गड संवर्धन या संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच गिरीतारा ट्रेकर्स आणि महेश दादा, जगदीश दादा, सतीश दादा यांचे विशेष सहकार्य लाभले.
दुपारी सहभागी सदस्यांना महेश दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आणि पुढील मोहीमेसाठी आवाहन करून संध्याकाळी चार वाजता या रौप्यमहोत्सवी मोहिमेचा समारोप करण्यात आला.
ही मोहीम केवळ ऐतिहासिक संवर्धन नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठी आपला वारसा जपण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे.