महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिरूर पोलिसांची यशस्वी कारवाई
शिरूर (जि. पुणे) – महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या दोन चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोनं जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. 26/07/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता, शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी भा.दं.वि. कलम 394(2), 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
संपूर्ण तपासामध्ये सहायक पोलीस निरीक्षक संदीप कंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम बडगुजर, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, विजय शिंगे, नितीन पिळाज, यांनी अथक प्रयत्न करत आरोपींचा माग काढला. अखेर 01/08/2023 रोजी दोन संशयितांना अटक करण्यात आली. आरोपींची नावे गणेश गायकवाड (वय 21, रा. सासवड) आणि सोनू कदम (वय 25, रा. कोथरूड) अशी आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत 29,680/- रुपये आहे.
दोन्ही आरोपींनी शिरूर परिसरात केलेल्या अन्य गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये दि. 06/07/2023, 14/07/2023, 21/07/2023, 30/07/2023 रोजी वेगवेगळ्या भागात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये भा.दं.वि. कलम 394 (2), 34 व 392, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी 9 ते 15 दिवसांच्या कालावधीत सातत्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. पोलिसांच्या वेळीच आणि काटेकोर कारवाईमुळे त्यांना पकडण्यात यश आले आहे. सदर कारवाईबद्दल शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाचे कौतुक होत आहे.
सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.