मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
– प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी, मांडवगण फराटा (ता. ५ एप्रिल)
शिरूर तालुक्यातील तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२५ ते २०३० या कार्यकाळाकरिता संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. अरुण साकोरे (सहाय्यक निबंधक) यांची नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेचे सचिव राहुल ढमढेरे हे सह-निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या निवडणुकीत एकूण १३ जागांसाठी ५३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण खातेदार कर्जदार मतदारसंघातून सर्वाधिक ३५ अर्ज आले आहेत. महिला प्रतिनिधींसाठी ७ अर्ज, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून ५ अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती व वि.मा.प्र. मतदारसंघातून ४ अर्ज आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून २ अर्ज प्राप्त झाले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ एप्रिल ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान असून, चिन्हांचे वाटप १७ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी मतदान २६ एप्रिल २०२५ रोजी मांडवगण फराटा येथील विद्याधाम प्रशालेत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. मतदानानंतर अवघ्या अर्ध्या तासात मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक अधिकारी अरुण साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या निवडणुकीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पॅनल कसे पडणार, कोण कुणासोबत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक व राजकीय दिग्गज नेते – लोकनेते मा. दादा पाटील फराटे, मा. व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, संचालक सुधीर फराटे, मा. चेअरमन मदनदादा फराटे, मा. गोविंद तात्या फराटे, संचालक संभाजी फराटे, मा. संचालिका लतिकाताई जगताप यांच्या भूमिका काय असतील, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीच्या रंगतदार समीकरणांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, विविध गटांचे हालचाल सुरू झाल्या आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही.