पिंपरी दुमालाचा समाजासमोर नवा आदर्श – ति. बा. धुमाळ यांचे गौरवोद्गार
पिंपरी दुमाला (ता. शिरूर) – जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करत आदर्श शांतीनिकेतन आणि त्यानंतर ग्रामदैवत सोमेश्वर महाराज मंदिराचा भव्य जिर्णोद्धार अशा प्रेरणादायी कार्याच्या जोरावर पिंपरी दुमाला गावाने संपूर्ण राज्यापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ति. बा. धुमाळ यांनी काढले.
येथील शालेय विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. “अगदी छोटंसं आणि आडबाजूला असलेलं हे गाव, पण गावकऱ्यांच्या एकजुटीच्या जोरावर उभे राहिलेले दोन गौरवशाली प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत,” असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, पिंपरी दुमालातील आदर्श शांतीनिकेतन शाळा २० गुंठे जागेवर साकारण्यात आली असून, तिच्या उभारणीने गावातील शिक्षणाचे चित्रच पालटले आहे. त्याचबरोबर सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चाने नव्याने उभारण्यात आलेले सोमेश्वर महाराजांचे मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून गावाच्या ओळखीचा मानबिंदू ठरत आहे.
या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास कोंढापुरी केंद्राचे प्रमुख यशवंत रणदिवे, सरपंच महेंद्र डोळस, उपसरपंच निकिता खेडकर, आदर्श सरपंच पुरस्कार विजेती गायत्री चिखले, माजी उपसरपंच शरद खळदकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभिषेक शेळके, मा. अध्यक्ष सुनील सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष हनुमंत तांबे आदींसह ग्रामपंचायतीचे आणि गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक राहुल चातुर, तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे, आणि स्वयंसेविका शोभा डोळस यांनी केले.
पिंपरी दुमालाने दाखवलेला हा विकासाचा मार्ग इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.