शिरूरमध्ये पहाटेच्या सुमारास गाडीत झोपलेल्या महिलेवर दरोडा, ९१ हजारांचे दागिने लंपास
शिरूर (पुणे): शिरूर तालुक्यातील बोराडे माळा येथे पुणे-नगर महामार्गावर गुरुवारी पहाटे (३ एप्रिल) एका गाडीत झोपलेल्या महिलेवर दरोडा टाकण्यात आला. दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील आणि कानातील ९१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले?
सुलोचना दुधाराम राठोड (वय ४०, रा. उत्तरवाढोणा, जि. यवतमाळ) या त्यांच्या नातेवाईकांसोबत एमएच ३७ एडी ८९०७ या चारचाकी गाडीत झोपल्या होत्या. पहाटे साडेचारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सुलोचना यांना धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कंठण आणि कानातील दोन अंगठ्या असा एकूण ९१ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेतला.
चोरीस गेलेले दागिने:
* एक मणी मंगळसूत्र (५ ग्रॅम) – ३५,००० रुपये
* एक कंठण (५ ग्रॅम) – ३५,००० रुपये
* दोन सोन्याच्या अंगठ्या (३ ग्रॅम) – २१,००० रुपये
पोलिसांचा तपास सुरू:
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) नकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत आहे.
