शिरूर पोलिसांची मोठी कारवाई – कुख्यात टोळीच्या तीन सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार
शिरूर, पुणे: शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील आणि करडे-सरदवाडी एमआयडीसी परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत शिरूर पोलिसांनी तीन जणांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या टोळीतील प्रमुख गुन्हेगार अभिषेक मिसाळ, शुभम दळवी आणि गणेश उर्फ श्रीशंग महाजन यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
सन 2016 ते 2024 दरम्यान, या आरोपींनी शिरूर परिसरात अनेक गंभीर गुन्हे केले. त्यात महामुनी टोळीचे प्रमुख संतोष महामुनी यांच्यासोबत स्वतंत्र टोळी तयार करून खंडणी उकळणे, मारामाऱ्या करणे, जबरदस्ती वसुली करणे आणि स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे समाविष्ट आहेत.
यातील अभिषेक मिसाळ याच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, शुभम दळवी आणि गणेश महाजन यांनी गावात शिवीगाळ, दमदाटी, मारहाणीचे प्रकार करून स्थानिक नागरिकांना त्रस्त केले होते.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका
या टोळीविरुद्ध वारंवार नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजगण एम. आय. डी. सी., सहायक पोलीस निरीक्षक हणमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरोपींवर विशेष लक्ष ठेवले.
पोलिसांनी गुन्हेगारी कृत्यांवर नोंद ठेवून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर अधीक्षक पंकज देशमुख यांनी हा प्रस्ताव मंजूर करत संबंधित गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
पोलिसांची कारवाई पुढेही सुरूच राहणार
पोलिसांनी इशारा दिला आहे की, शिरूर व आसपासच्या परिसरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही. भविष्यात अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. या कामगिरीत पोलीस उपअधीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार परशराम सांगणे, नामदेव बनकर, रमेश बाबर आदी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिरूर पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक चोख राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.