शिरूर तालुक्यातील चार सुपुत्रांची न्यायाधीशपदी नियुक्ती
शिरूर प्रतिनिधी- अल्लाउद्दीन अलवी
शिरूर तालुक्यातील चार युवकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर न्यायव्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. ऍडवोकेट अक्षय ताठे, ऍडवोकेट सागर नळकांडे, ऍडवोकेट शुभम कराळे आणि ऍडवोकेट सुमेधा वाखारे यांची प्रथम वर्ग न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही चौघेही पुण्यात सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदाच्या परीक्षेची तयारीही करत होते. अखेर त्यांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करून न्यायाधीशपद मिळवले.
शैक्षणिक प्रवास आणि प्रेरणा
कारेगाव (ता. शिरूर) येथील ऍडवोकेट अक्षय ताठे आणि ऍडवोकेट सागर नळकांडे यांनी पुण्यातील वेगवेगळ्या विधी महाविद्यालयांतून शिक्षण घेतले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएल.एम. पूर्ण केले.
शिक्रापूरचे ऍडवोकेट शुभम कराळे यांचा शैक्षणिक प्रवासही पुण्यातच झाला. वकिली व्यवसाय करत असतानाच त्यांनी न्यायाधीश होण्याचे ध्येय समोर ठेवून मेहनत घेतली. त्यांना अभ्यासक्रमासाठी जेष्ठ विधीतज्ञ ऍडवोकेट गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाणे ऍडवोकेट सुमेधा वाखारे यांचे शालेय शिक्षण शिरूरमध्ये झाले. त्यांनी पुढे पुण्यात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील ऍडवोकेट बाजीराव वाखारे हे पंचक्रोशीत प्रख्यात कायदेतज्ञ आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी ही परीक्षा दिली आणि यश संपादन केले.
सन्मान समारंभाचे आयोजन
या चारही न्यायाधीशांनी एकत्रित अभ्यास करून हे यश संपादन केल्यामुळे शिरूर तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या निमित्ताने शिरूर वकील संघटनेच्या वतीने पाच एप्रिल रोजी त्यांचा विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष, नोटरी ऍडवोकेट अमित खेडकर यांनी या संदर्भात माहिती दिली.
शिरूर तालुक्यातील युवकांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरणार असून, भविष्यात अशा अधिकाधिक यशस्वी कहाण्या घडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.