व्यवसायिक कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; मानसिक त्रासाने उद्योजकाची आत्महत्या
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) – कर्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याच्या कारणावरून एका उद्योजकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
श्रीमती जनाबाई संग्राम सातव (वय ४२, रा. शेळके वस्ती, रांजणगाव गणपती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती संग्राम सातव (वय ४६) यांनी जे.एम.एन. इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीच्या विस्तारासाठी कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी उपेंद्र (इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे), विशाल घाटगे आणि मच्छिंद्र पोपट झंजाड यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती.
असा झाला व्यवहार:
* उपेंद्र यांनी ५ कोटींच्या कर्जासाठी ४० लाख रुपयांचे कमिशन मागितले.
* विशाल घाटगे यांनी ५० लाखांच्या कर्जासाठी ५ लाख रुपयांचे कमिशन मागितले.
* मच्छिंद्र झंजाड यांनी कर्ज मिळवून देण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली.
फिर्यादीच्या पतींनी हे पैसे घरावर कर्ज काढून आणि अन्य ठिकाणांहून उसने घेऊन दिले. मात्र, आरोपींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आणि कर्ज मंजूर झाले नाही. संग्राम सातव यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी फोन न उचलता त्यांना टाळले. त्यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या संग्राम सातव यांनी आत्महत्या केली.
पोलिसांचा तपास व कारवाई:
रांजणगाव पोलीस ठाण्यात कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तिडके आणि पो हवा नागरगोजे तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे) आणि मच्छिंद्र पोपट झंजाड (रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली असून ५ एप्रिल २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
