विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर
उदगीर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युवा नेतृत्व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी केले. ते विद्या वर्धिनी हायस्कूल येथे आयोजित पालक मेळाव्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलींच्या भविष्याविषयी स्वप्ने बाळगतो. मात्र, या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांचे संगत व वर्तणूक याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्या वर्धिनी शाळा म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा संगम असून, येथे विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य केले जाते. पालक मेळाव्यातून अनेक विचारांची देवाण-घेवाण होत असून, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष आणि कार्यक्रमाध्यक्ष गुंडेराव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शाळेच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. Often, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक राम ढगे, कार्यालयीन प्रमुख डी. पी. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक बी. बी. नागरवाड, पालक सदस्य धनराज पाटील, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार वलाकटे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी. बी. नागरवाड यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन जमील अत्तार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बंडू पाटील लोणीकर यांनी मानले.