राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा रांजणगाव गणपती येथे संपन्न होणार
रांजणगाव गणपती – महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने उत्कृष्ट साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा येत्या रविवारी रांजणगाव गणपती येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कवी मनोहर परदेशी यांनी दिली.
या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा उत्कृष्ट साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, ललित साहित्य या विभागांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यिकांमध्ये दीपक तांबोळी, लक्ष्मण दिवटे, दत्ता पाटील, कमलाकर राऊत, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, गणेश भाकरे, प्रकाश बोधे, सुभा लोंढे आणि अलकनंदा घुगे यांचा समावेश आहे. या मान्यवर साहित्यिकांचा सन्मान चिन्ह, रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यासोबतच, शिरूर तालुक्यातील पाच साहित्यिकांचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. यामध्ये संभाजी शिवले, शंकर नहे, दत्तात्रय जगताप, दादाभाऊ गावडे आणि रुपाली भोरकडे यांचा समावेश आहे. या साहित्यिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष कुंडलिक कदम यांनी दिली.
या विशेष सोहळ्याचे अध्यक्षस्थान मांडवगण फराटा येथील प्रसिद्ध कावीळ तज्ञ डॉ. धनंजय शिंदे भूषविणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ प्रबोधनकार उत्तम आण्णा भोंडवे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:३० वाजता ग्रंथपूजनाने होणार असून, याबाबतची माहिती मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड यांनी जास्तीत जास्त साहित्यिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
साहित्यप्रेमींसाठी हा एक महत्त्वपूर्ण सोहळा ठरणार असून, विविध क्षेत्रातील साहित्यिकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क – 9359541560
❤️❤️डिजिटल पत्रकार साठी लवकरच नेमणूक,,,,,,❤️❤️