सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंथा सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विश्वस्त मंडळाने चर्चा करून सर्वानुमते अभिषेक शेळके यांची अध्यक्षपदी निवड केली.
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामध्ये श्री सुनील सोनवणे, श्री शेखर पाटेकर, श्री कैलास पिंगळे, श्री अरुण कळसकर, श्री कैलास बडदे आणि डॉ. श्रीकांत सोनवणे कार्यरत आहेत. या विश्वस्त मंडळाने सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे मार्गी लावली आहेत.
महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तीचा महासागर ठरतो. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून माणुसकी समृद्ध करण्याचा हा सोहळा साजरा केला जातो. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांना सुख-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही पंचक्रोशीत सातत्याने राबवले जातात.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अभिषेक शेळके यांनी आपल्या कार्यकाळात देवस्थान ट्रस्ट आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.