दौंड-पुणे लोकल पुनः सुरू करण्यासाठी प्रवाशांचा एल्गार
पुणे : लोकल ट्रेन हा प्रवासाचा सर्वसामान्यांसाठी सर्वात परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय आहे. अन्य प्रवासाच्या साधनांपेक्षा कमी खर्चिक असल्याने अनेक नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर नागरिक यासाठी लोकल प्रवासावर अवलंबून असतात. मात्र, काही कारणांमुळे दौंड-पुणे लोकल बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी लोकल त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
रेल्वेप्रवासी ग्रामीण संघटनेने पुणे रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे की, १ एप्रिलपासून दौंड-पुणे लोकल सुरू न केल्यास दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोबत घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर बेमुदत उपोषण करण्यात येईल. तसेच, पाच दिवसांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास प्रवासी दौंड रेल्वे स्थानकावर चक्का जाम आंदोलन करतील. या आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दौंड-पुणे लोकल सुरू करण्याच्या बाबतीत रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने दिली आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीही कारवाई झाली नाही. इलेक्ट्रिक लोकल चालू करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी रेल्वेसाठी जमिनी दिल्या आहेत, तरीही लोकल केवळ कागदोपत्री राहिली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष सारिका भुजबळ यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे की, जर दौंड-पुणे लोकल त्वरित सुरू झाली नाही, तर प्रवासी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रवाशांच्या हक्कांसाठी ही लढाई अधिक तीव्र केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.