म्यानमारमध्ये भीषण भूकंप: मृतांची संख्या १६४४ वर, भारतासह अनेक देश मदतीसाठी पुढे
म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी हानी झाली असून, शनिवारी संध्याकाळपर्यंत मृतांची संख्या १६४४ वर पोहोचली आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ३,४०८ जण जखमी झाले असून, १३९ लोक बेपत्ता असल्याचे अहवाल सांगतात. तसेच, शेजारच्या थायलंडमध्येही भूकंपाचा मोठा परिणाम झाला असून, १० जणांचा मृत्यू, २६ जण जखमी आणि ७८ जण बेपत्ता आहेत.
अस्थिर परिस्थितीत मदत कार्याला अडथळे
म्यानमारमध्ये आधीच अंतर्गत संघर्ष व हिंसाचारामुळे अस्थिरता आहे. त्यातच या भूकंपामुळे देशावर मोठे संकट कोसळले आहे. बचाव कार्यात राजकीय अस्थिरता, संसाधनांची कमतरता आणि उध्वस्त झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे अनेक अडचणी येत आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराजवळ होता आणि त्याचे तीव्र धक्के थायलंडमधील बँकॉकसह भारतातील काही ठिकाणी जाणवले. भूकंपामुळे अनेक पूल, इमारती आणि एक धरण कोसळले आहे. राजधानी नेप्यिडॉमध्ये वीज, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा खंडित झाली आहे.
थायलंडमध्येही मोठा परिणाम
थायलंडच्या बँकॉक शहराला भूकंपाचा तडाखा बसला असून, चातुचाक मार्केट परिसरातील एक मोठी इमारत कोसळली आहे. या ठिकाणी ४७ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर कोसळला
नेप्यिडॉ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा टॉवर भूकंपामुळे कोसळला. या ठिकाणी किती कर्मचारी होते आणि त्यातील किती जण जखमी किंवा मृत झाले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारताने मदतीचा हात पुढे केला
भारत सरकारने तातडीने मदत कार्य सुरू केले असून, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत १५ टन मदत सामग्री हवाई दलाच्या विमानाने म्यानमारला रवाना करण्यात आली आहे. तसेच, भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री या दोन जहाजांद्वारे ४० टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या ८० जवानांची तुकडीही म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या लष्करी राजवटीच्या प्रमुख मिन आंग हाइंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत या संकटाच्या काळात म्यानमारच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे आश्वासन दिले. मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, “म्यानमारमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. भारत आपत्कालीन मदतीसाठी सज्ज आहे आणि भूकंपग्रस्त भागात सर्वतोपरी मदत करणार आहे.”
आंतरराष्ट्रीय सहकार्य
संयुक्त राष्ट्र संघटनेने म्यानमारसाठी ४२ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. चीन आणि रशियानेही मोठी मदत पाठवली आहे. चीनमधील युनान प्रांतातून ३७ जणांचे बचाव पथक यांगून येथे दाखल झाले आहे. बीजिंगहून आणखी ८२ जणांचे मदत पथक म्यानमारमध्ये पोहोचले आहे. रशियाने १२० जणांचे बचाव पथक आणि साहित्याने भरलेली दोन विमाने म्यानमारला पाठवली आहेत. मलेशियानेही ५० जणांचे मदत पथक तिथे पाठवले आहे.
मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्क
मणिपूर राज्यातील ननी जिल्ह्यात शनिवारी दुपारी २:३१ वाजता ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकृत अहवाल सांगतात.
बचाव आणि पुनर्वसनावर भर
म्यानमारमध्ये भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचे प्रमाण मोठे असल्याने मदत आणि पुनर्वसनासाठी अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असण्याची शक्यता असल्याने शोधकार्य वेगाने सुरू आहे. सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येऊन भूकंपग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.