बारागाव नांदूर परिसरात बेपत्ता महिलेने वाढवली भीती; बिबट्याने ओढून नेल्याचा संशय
राहुरी (प्रतिनिधी): राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एका 32 वर्षीय महिलेच्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या या महिलेला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ही महिला बारागाव नांदूर आणि डिग्रसच्या शिवारात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेली होती. मात्र, रात्र होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मिळून जवळपास 250 ते 300 एकर परिसरात शोध घेतला, परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही. शोध घेत असताना शेतात महिलेच्या अंगावरील काही कपडे सापडल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक गडद झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे. वनपाल युवराज पाचरणे, वनक्षेत्रपाल राजू रायकर आणि त्यांचे सहकारी गोरक्षनाथ मोरे, ताराचंद गायकवाड यांच्यासह सुमारे 700 ते 800 तरुणांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात कसून शोध घेतला. या शोधमोहिमेदरम्यान महिलेच्या गळ्यातील मणी आणि मंगळसूत्र सापडले आहेत, ज्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला आहे.
राहुरी पोलिसांनीही या घटनेची नोंद घेऊन महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक दृष्टीने तपास करत आहेत. तांत्रिक विश्लेषणात महिलेचा मोबाईल शेवटपर्यंत सुरू होता आणि त्यानंतर तो अचानक बंद झाला, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस इतर शक्यतांचाही विचार करत आहेत.
या घटनेमुळे बारागाव नांदूर आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थ भयभीत झाले असून, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणी ठोस कारवाई करावी, अशी मागणी करत आहेत. बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याने परिसरात चिंता आणि तणाव आहे.
