ज्ञानदीप ग्रंथालयने उभारली ‘पुस्तकांची गुढी’
दौंड प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस, ता. दौंड: राज्यभरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्याच पार्श्वभूमीवर पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालयाने यंदा एका अनोख्या संकल्पनेतून ‘पुस्तकांची गुढी’ उभारून समाजासमोर वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा नवा आदर्श ठेवला आहे.
मराठी भाषेला काही महिन्यांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या गुढीपाडव्याचे औचित्य अधिकच वाढले होते. या पार्श्वभूमीवर ज्ञानदीप ग्रंथालयाचे विश्वस्त हर्षद बंदीष्टी यांच्या संकल्पनेतून पारंपरिक गुढी उभारण्यासोबतच ‘पुस्तकांची गुढी’ उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे सगळीकडून कौतुक होत आहे.
गुढी हा विजय आणि समृद्धीचा प्रतीक असतो. घरासमोर गुढी उभारून आपण आपली संस्कृती आणि परंपरा जोपासतो. मात्र, त्यासोबतच वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी ‘पुस्तकांची गुढी’ हा अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाचनाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, मराठी अभिजात भाषेचे महत्त्व अधिक दृढ व्हावे आणि समाजातील प्रत्येक घटकाने वाचनाची सवय लावून घ्यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
ज्ञानदीप ग्रंथालय केवळ वाचनसंस्कृतीसाठी कार्य करत नाही, तर विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असते. गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य दान करणे, शिक्षण संस्थांच्या ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षांसंदर्भातील पुस्तके देणे, तसेच उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडणे असे विविध उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून राबवले जातात.
या उपक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांनी ‘पुस्तकांची गुढी’ संकल्पनेचे स्वागत केले आहे. याप्रसंगी ज्ञानदीप ग्रंथालयाचे विश्वस्त हर्षद बंदीष्टी, प्रमोद ढमाले, विठ्ठल वाळुंजकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक नागरगोजे, गणेश सूळ आदी मान्यवर उपस्थित होते.