शिरूर पोलीस ठाण्यात दंगा काबू योजनेचा रंगीत सराव संपन्न
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी हिंदू-मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11:00 ते 11:30 वाजेपर्यंत शनी मंदिर परिसरात दंगा काबू योजनेचा (रायट कंट्रोल ड्रिल) रंगीत सराव घेण्यात आला.
गुढीपाडवा, रमजान महिना, श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास हे सण अनुक्रमे एकामागोमाग असल्याने कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच भाग म्हणून हा सराव आयोजित करण्यात आला होता.
सरावाच्या वेळी हॅन्ड ग्रेनेडचा वापर
या दंगा काबू सरावादरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. एकूण तीन हँड ग्रेनेड खर्ची करण्यात आले. तसेच, जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी विविध रणनीतींचा सराव केला.
सरावासाठी पोलिसांची तगडी तैनात
या सरावासाठी १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलीस अंमलदार हजर होते. पोलीस दलाच्या चोख तयारीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव यशस्वीपणे पार पडला.
शहरातील सुरक्षेसाठी पोलिसांचा सतर्कपणा
शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी सण-उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही अफवा अथवा गैरप्रकार लक्षात आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असेही सांगण्यात आले.
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर पोलिस दल सदैव सतर्क असून, गरज पडल्यास आणखी कठोर उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.