वाघोलीत दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुंडांना दोन वर्षांसाठी तडीपार
पुणे: वाघोली परिसरात कोयत्याचा धाक दाखवून, तोडफोड करून आणि समाजमाध्यमांचा वापर करून दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली.
तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार
- रोहन ऊर्फ मोन्या रामप्यारे गिरी (वय २०, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली)
- विकास राजू जाधव (वय २०, रा. केसनंद फाटा, वाघोली)
- आदित्य दीपक कांबळे (वय १८, रा. सिद्धी विनायक पार्क, वाघोली)
- वैभव सुभाष पोळ (वय १८, रा. बीजीएस फाट्याजवळ, वाघोली)
दहशतीचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने पुणे-अहिल्यानगर रोड, वाघोली, बकोरी फाटा, वाघोली बाजारतळ आणि परिसरात नागरिकांना धाकात ठेवून दहशत माजवली होती. गंभीर दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे आणि नागरिकांना धमकावणे असे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी कायम भीतीच्या छायेत जगत होते.
पोलिसांनी कसा लावला तपासाचा छडा?
या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या गुन्हेगारांविरोधातील सर्व गुन्ह्यांचे अभिलेख तपासले.
त्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपार करण्याचा प्रस्ताव उपायुक्त हिम्मत जाधव यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देत त्यांनी या चौघांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांचा इशारा: अशा गुंडांना सोडणार नाही!
पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, समाजमाध्यमांचा गैरवापर करून आणि शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत तडीपार, मोक्का आणि एनएसएसारखे कायदे लावण्याची तयारी आहे.
या अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे आणि त्यांच्या पथकाने केली.
यामध्ये पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे, प्रशांत कर्णवर, प्रदीप मोटे, महादेव कुंभार, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे, समीर बोरडे यांचा मोलाचा सहभाग होता.
पोलिसांचा पुढील मोहिमेवर भर
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा गुंडांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येईल. वाघोलीसारख्या उपनगरात शांतता टिकवण्यासाठी पोलिसांनी पुढील कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे.