माजी आमदार अशोक पवारांना शिरूरमध्ये मोठा धक्का; खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
– शिरूर तालुक्यात माजी आमदार अशोक पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन आणि नवनिर्वाचित संचालकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आज मुंबई येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन बाळासाहेब नागवडे, संचालक सर्जेराव दसगुडे, नवनाथ ढमढेरे, मनिषा शेलार यांच्यासह नाना पाचर्णे, बाळासाहेब टेमगिरे आणि लहू थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.
यावेळी क्रीडा मंत्री दत्ता भरणे, माजी आमदार पोपटराव गावडे, कात्रज दूध संघाचे चेअरमन स्वप्नील ढमढेरे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अण्णासाहेब महाडिक, शिरूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष रविबापू काळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापू पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी अध्यक्ष मानसिंग पाचूदकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा पाचारणे, युवा नेते स्वप्निलभैय्या गायकवाड, कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, शहराध्यक्ष शरदभाऊ कालेवार, माजी संचालक कैलासराव सोनवणे, संघाच्या संचालिका सुजाताताई नरवडे, शिरूर शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा श्रुतिकाताई झांबरे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा तज्ञिकाताई कर्दिले, शिरूर तालुका युवक अध्यक्ष अमोल वर्पे, शहर माजी अध्यक्ष रंजनभैय्या झांबरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र नरवडे आणि व्हॉइस चेअरमन बाळासाहेब नागवडे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला.
शिरूर तालुका खरेदी-विक्री संघ हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेतील महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी काळात शिरूरच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या प्रवेशामुळे माजी आमदार अशोक पवार यांच्या राजकीय ताकदीला निश्चितच आव्हान निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि शिरूर तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा दर्शवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आणि तालुक्याला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.