गूळ व्यवसाय चांगला, पण पर्यावरणाचा ऱ्हास अक्षम्य! – उमेश रणदिवे
गुऱ्ळाच्या चुकीच्या पद्धतीमुळे पर्यावरण आणि आरोग्यधोक्यात!
गूळ हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. गुळाची काकवीही लहानथोरांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, हा गूळ सहजासहजी तयार होत नाही. दौंड तालुक्यातील केडगाव आणि त्याच्या आसपासची गावे, तसेच शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा आणि रांजणगाव सांडस या भागात मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळे सुरू आहेत. हे गुऱ्हाळे गूळ तयार करून एक सामाजिक कार्य करत असले, तरी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती अत्यंत धोकादायक आहेत
गूळ व्यवसायाला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीला मात्र नक्कीच!
गूळ व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह चालत आहे, हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, या व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या अपायकारक पद्धतींमुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा याबाबत लोकांनी आवाज उठवला, मात्र राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेपामुळे हा आवाज दाबण्यात आला.
गुऱ्हाळांमुळे वाढते प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम!
1. पर्यावरणाची हानी:
गुऱ्हाळांमध्ये जळणासाठी चपला, टायर, प्लास्टिक यांसारख्या वस्तूंचा वापर सर्रास केला जातो.
त्यामुळे हवेत विषारी वायू पसरतो, ज्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर आणि आरोग्यावर होत आहे.
गुऱ्हाळांच्या आसपासच्या परिसरात भयंकर दुर्गंधी असते. स्वच्छ भारत अभियानाचा या ठिकाणी कुठेही थांगपत्ता नाही.
2. मानवी आरोग्यावर परिणाम:
गुऱ्हाळांमधून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे परिसरातील नागरिकांना दमा, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार होण्याचा धोका वाढतो.
विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना या प्रदूषणाचा जास्त त्रास सहन करावा लागतो.
3. शेतीवर होणारे दुष्परिणाम:
गुऱ्हाळांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या आणि राखेच्या परिणामामुळे शेतीच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
अन्न सुरक्षा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष!
खाद्य आणि अन्नपुरवठा विभागाने घालून दिलेले नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. गूळ बनवणाऱ्या गुऱ्हाळांना आवश्यक असलेली परवाने घेतले जातात, मात्र प्रदूषणविरोधी नियम पाळले जात नाहीत.
भविष्यात कायदेशीर कारवाई होणार
मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांचे महत्त्व मला समजते. मात्र, दहा-पाच रुपयांच्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गुऱ्हाळांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी मी लवकरच कायदेशीर पद्धतीने कारवाई करणार आहे. भविष्यात जर या गुऱ्हाळांची परवाने जप्त झाले, तर त्याला जबाबदार मी राहणार नाही.
निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा, याचे गंभीर परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील!