सावत्र वडिलांच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीचा चाकू हल्ला; वडील गंभीर जखमी
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन येथे सावत्र वडिलांच्या सततच्या लैंगिक छळाला कंटाळून 24 वर्षीय तरुणीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला असून, हल्ल्यात रमेश भारती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचा तपशील
पीडित तरुणी नालासोपारा पूर्वेतील सर्वोदयनगर चाळीत राहत होती. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईने दुसरे लग्न केल्यानंतर सावत्र वडील रमेश भारती मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी भारती यांनी पुन्हा शरीरसंबंधाची मागणी केल्यानंतर तरुणीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला तिने लाज वाटते असे सांगून भारती यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यानंतर अचानक चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात भारती यांच्या गुप्तांगासह अन्य ठिकाणी गंभीर इजा झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ते घराबाहेर पडले असता, तरुणीने त्यांना रस्त्यात गाठून पुन्हा सपासप वार केले.
तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर तरुणी हातात चाकू घेऊन परिसरात फिरत होती. स्थानिक नागरिकांनी तिच्या या अवस्थेचा व्हिडीओदेखील शूट केला आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.