अनैतिक संबंधातून वाद – तरुणाने विधवा महिलेचा गळा आवळून केला खून – भंडारा
संपादक – रमेश बनसोडे
लाखनी तालुक्यातील मोगरा/शिवणी गावात अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे एका तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. ही घटना २१ मार्च रोजी घडली.
मृत महिलेचे नाव पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७) असून, आरोपीचे नाव खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७) आहे. दोघेही एकाच गावातील रहिवासी होते. पुष्पा बनकर या भाजीपाला विक्री करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत होत्या. त्यांच्या पतीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने पुष्पा बनकर यांना शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने खुशाल याने रागाच्या भरात नॉयलॉन दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला.
मागील अडीच वर्षांपासून मृतक महिला व आरोपीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी पुष्पा बनकर आपल्या शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. तिथेच आरोपीने त्यांच्याशी वाद घालून शेजारच्या सागवानाच्या वाडीत त्यांचा खून केला.
घटनेनंतर खुशाल पडोळे स्वतः लाखनी पोलीस ठाण्यात हजर झाला व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे पाठवला.
या घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हाण, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव आणि लाखनी पोलिस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.